हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-नारायणगड ०४

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇
⛳⛳ *किल्ले नारायणगड* ⛳⛳
किल्ल्याची ऊंची :  2557
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
नारायणगाव जवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड आहे. शिवनेरी किल्ला, जुन्नर ही बाजारपेठ आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग यांच्या जवळ असल्यामुळे नारायणगड किल्ला एकेकाळी महत्वाचा किल्ला असावा. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायर्‍या आणि टाक्यांवरुन किल्ल्याची बांधणी सातवहान काळात झाली असावी. किल्ल्या जवळ असलेल्या खोडद गावात उभारलेल्या Giant Metrewave Radio Telescope (GMRT) मुळे हा भाग पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आला. किल्ल्यावर जातांना आणि किल्ल्यावरून या टेलिस्कोप पाहायला मिळतात. मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहाता येतो.

पहाण्याची ठिकाणे :किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिरापासून सिमेंटने बांधलेल्या पायऱ्यानी १० मिनिटे चढल्यावर कातळ कोरीव पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्यांनी १० मिनिटे चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला टेकाड दिसतात. त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तामाता मंदिर आहे. मंदिरात गावकर्‍यांचा वावर असल्यामुळे मंदिरपर्यंत जाणारी पायवाट ठलक आणि मळलेली आहे. मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या दिशेला) एक पायवाट खाली उतरते. या पायवटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्याच टाक पाहायला मिळते. टाक पाहून परत हसतामाता मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. यात शरभ शिल्प कोरलेले दोन दगड आणि व्दारपट्टीवर कोरलेल्या गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे. वाडा पाहून परत पायवाटेवर येउन किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर असलेल्या हस्तामाता मंदिराकडे चालायला सुरुवात करावी. गावकऱ्यांनी हस्तमातेचे नविन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे. त्या सिमेंटच्या कळसाखाली देवीचे जुने दगडी मंदिर अजूनही शाबूत आहे . साधारण चार फुट उंच असलेल्या या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तामातेची मुर्ती आहे.

मंदिरात विश्रांती घेउन आल्या पायवाटेने खाली उतरुन गडावर प्रवेश केला त्या ठिकाणी यावे. आता समोरच्या बाजूला नारायणगडाचे दुसरे टेकाड दिसते. प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस जाउन (दरी डावीकडे व टेकाड उजवीकडे ठेवत) चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक खांब टाके दिसते. त्या टाक्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. या टाक्याला नारायण टाके अस नाव आहे . या टाक्याच्या पुढे जाणाऱ्या वाटेने दरीच्या बाजूस उतरल्यावर झाडीत लपलेला चोर दरवाजा पाहाता येतो. परंतु इथे जाणारी वाट झाडीत लुप्त झाल्याने स्थानिक वाटाड्या बरोबर असल्यास दरवाजा पाहाता येतो. दरवाजा पाहून परत पायवाटेवर येउन पुढे न जाता पुन्हा मागे नारायण टाक्यापाशी येउन पुन्हा किल्ल्यावर प्रवेश केला त्याठिकाणी यावे. तेथून टेकडी डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत थोडे चालत गेल्यावर पाच टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. ही टाकी मागे वळून प्रवेशव्दाराकडे येतांना किल्ल्याच्या डोंगराच्या कडेला, पायर्‍यांच्या वरच्या बाजूस एक टाक आहे. या टाक्यासमोर तटबंदीचे अवशेष आहेत. हे पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला संपूर्ण पाहाण्यास एक तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :मुंबईहून कल्याण, माळशेज मार्गे आळेफ़ाटा गाठावे. आळेफ़ाट्याहून दोन मार्गाने गडा पायथ्याच्या गडाच्या वाडीत जाता येते.
१) आळेफ़ाट्याहून पुण्याकडे जाणार्‍या रस्त्यावर वळल्यावर २ किमी अंतरावर नविन बांधलेला टोल नाका लागतो. तो पार केल्यावर कुकडी नदीवर बांधलेला पुल आहे. हा पुल पार केल्यावर लगेच डाव्या बाजूला एक छोटा रस्ता जातो. हा रस्ता कच्चा असून कालव्याच्या बाजूने जातो. पुढे नारायणगावाहून येणार्‍या रस्त्याला हा रस्ता मिळतो आणि गडाखालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. मुंबईहून नारायणगडाला जाणार्‍यांसाठी हा जवळचा मार्ग आहे. पण याचा बराचसा भाग कच्चा असल्याने पावसाळ्यात टाळावा. यामार्गाने आळेफ़ाटा ते मुकाई देवी मंदिर अंतर १६ किमी आहे

२) आळेफ़ाट्याहून नारायणगाव गाठावे. नारायणगाव एसटी स्थानका समोरुन एक रस्ता खोदडला जातो. या रस्त्याने ९ किमी अंतरावर एक चौक लागतो. येथून सरळ रस्ता खोडदला जातो तर डाव्या बाजूचा रस्ता गडाची वाडी मार्गे किल्ल्या खालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. यामार्गाने नारायणगाव ते मुकाई देवी मंदिर अंतर १०.५ किमी आहे. नारायणगावहून खोडदला जाणार्‍या एसटीने आल्यास चौकात उतरून गडाची वाडीमार्गे मुकाईदेवी मंदिरापर्यंत चालत जाण्यास अर्धातास लागतो.
राहाण्याची सोय :किल्ल्या खालील मुकाई देवी मंदिरात आणि किल्ल्यावरील हस्तामाता मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :नारायणगावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : मुकाईदेवी मंदिरापासून किल्ला चढण्यास ३० मिनिटे लागतात. जाण्यासाठी उत्तम कालावधी : किल्ला छोटा असल्याने वर्षभर जाता येते.
🌺🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...