हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ला-रोहीडा १५

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇
⛳⛳⛳ *किल्ले रोहिडा* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची : 3660
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खोर्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोर्यात वसलेले आहे. या खोर्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खोर्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे,सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहोचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला ‘विचित्रगड‘ किंवा ‘बिनीचा किल्ला‘ असे देखील संबोधले जाते.

इतिहास :या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसर्या दरवाजावर असणार्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकार्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकार्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता.
पहाण्याची ठिकाणे :
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायर्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे याचे पाणी बाराही महिने पुरते येथून ५७ पायर्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बर्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे.
येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी, तर दुसरे किल्लेदाराचे निवासस्थान असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर ‘रोहिडमल्ल‘ उर्फ ‘भैराबाचे मंदिर‘ लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहे.
गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास साधारणत: दीड तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बाजारवाडी मार्गे :-
भोरच्या दक्षिणेस ८ - १० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहोचण्यास एक तास लागतो.

२) अंबवडे मार्गे :-
भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पूणे - भोर - पानवळ - अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास लागतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

३) रोहीडा ते रायरेश्वर वाटा :-
१) भोर - कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहोचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो.
२) वडतुंबी मार्गे दुपारची (२.४५) भोर - टिटेघर गाडी आंबवण्यास येते, तिने वडतुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडतुंबी गाव गाठणे. येथून साधारणत… २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहोचता येते.
३) भोर - कोर्ले गाडीने कोर्ले गावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते.
४) भोर - दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरावे व तिथून धानवली पर्यंत चालत जावे. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठता येते.
राहाण्याची सोय :रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात राहता येत नाही.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्व:त…च करावी.
पाण्याची सोय :गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :बाजारवाडी मार्गे १ तास लागतो.
🥗🥗🥗🥗🥗🥗

किल्ला- तैलबैला १४

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇

⛳⛳⛳ *किल्ले तैलबैला* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची : 3332
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे
श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.

प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.
१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.
२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.
त्यातील एक म्हणजे "वाघजाई घाट ". या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड , आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूने सरसगडाचा माथा दिसतो.
पहाण्याची ठिकाणे :तैलबैला गावातून विशाल भिंतींच्या दिशेने चालत गेल्यावर, उजव्या बाजूच्या पायवाटने आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी रुळलेली वाट तैलबैलाच्या "V " आकाराच्या खिंडीत येऊन पोहोचते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो.

तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा आहे. या गुहेमध्ये २-४ शेंदूर लावलेले दगड आणि पूजेचे साहित्य आहे. हे ग्रामस्थांच श्रद्धास्थान असून २०१३ मध्ये तेथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. गुहेमध्येच उजव्या बाजूला एक बारामाही पाण्याचं टाकं देखील आहे आणि त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात.

तैलबैलाच्या माचीवर पोचल्यावर जी रुळलेली वाट आपल्याला खिंडीत घेऊन जाते; त्या वाटेवरून चालताना उजव्या बाजूच्या वरच्या अंगाला उत्तरेकडे पसरलेली भिंत आपल्याला साथ देत असते. खिंडीतून ५-६ पावलं खाली येऊन डाव्या बाजूने वरच्या वाटेने तसेच पुढे जावे. या बाजूस उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटात आपल्याला २ गुहा बघायला मिळतात. त्यामधील एक गुहा छोटी तर दुसरी गुहा बर्यापैकी रुंद आहे. गुहेच्या थोड पुढे एक सुकलेल टाकं देखील बघायला मिळत.

गिर्यारोहणाच सामान न वापरता आपण तैलबैलाच्या खिंडीत जाऊन वरील ठिकाणे पाहू शकतो.

तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीवर चढाई करण्यासाठी खिंडीतल्या गुहेच्या उजवीकडून रोपच्या सहाय्याने चढाईची सुरुवात करावी. दक्षिण दिशेकडे पसरलेली ही कातळभिंत अर्ध्यापर्यंत चढून गेल्यावर, डाव्या बाजूला थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या ४ ते ५ पायर्या आहेत. त्या पायर्या चढून गेल्यावर एक गुहा लागते. गुहेमध्ये साधारण ४-५ माणसं नीट बसू शकतात. या गुहेवरून तसेच पुढे चालत गेल्यावर कातळावर ३ गिरीदेवातांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. त्यापुढे दुसरी गुहा आहे. गुहेच्या पुढे स्वछ व पिण्यायोग्य असे पाण्याचे खांब टाके आहे. हे टाके ओलांडून कातळावरून पुढे गेल्यावर १०-१५ पावलांवर दुसरे टाके आढळून येते.

हे सर्व पाहून परत दुसर्या गुहेच्या बाजूस असलेल्या टाक्यापाशी येऊन रोपच्या सहाय्याने वरचा कातळ चढून गेल्यावर डाव्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्या दिसून येतात. या पायर्यांवरून थोडा चढ चढल्यावर आपण भिंतीच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर बर्यापैकी सपाटी असून, डावीकडील टोकापर्यंत जायला एक वाट आहे. तेथे १-२ जांभूळची झाडे आहेत. परंतु बाकी पूर्ण परिसरात एकही झाड दृष्टीस पडत नाही.

उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळभिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी मात्र पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीच्या मध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही.

तैलबैलाच्या दोन्ही भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र पूर्णपणे अवगत असणे आणि गिर्यारोहणाचे सामान असणे अत्यावशक आहे.
पोहोचण्याच्या वाटा :तैलबैला गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई / पुणे येथून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डे कडे जाणारी एस. टी पकडावी. पेठशहापूर (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे ८.५ किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्या रस्त्यावर तैलबैला असा फलक लावलेला आहे. या फाट्यावर उतरावे. फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर असून, हे अंतर पायी १५ ते २० मिनिटात कापून आपण गावामध्ये पोहोचतो. लोणावळा बस स्थानकातून संध्याकाळी तैलबैला गावासाठी थेट बस सुटते. ती बस रात्री तैलबैला गावात थांबून सकाळी परत जाते.

खाजगी वहानाने तैलबैलाच्या पायथ्याशी असणार्या तैलबैला गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे Aamby Valley च्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून भांबुर्डेकडे जाणारा रस्ता पकडावा. या खडबडीत डांबरी रस्त्याने ८.५ किमी गेल्यावर तैलबैला गावात जाणारा फाटा लागतो. या फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :गडावर रहाण्याची सोय नाही. पण तैलबैला गावात किंवा गावात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये रात्री पुरती रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :खिंडीमध्ये असलेल्या गुहेत बारामाही पाण्याचे टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
सूचना :जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे.
१) तैलबैला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२) सोबत २- ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.
🥗🥗🥗🥗🥗

किल्ला उंबरखिंड १३

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇


⛳⛳⛳ *उंबरखिंड* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 2108

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: लोणावळा

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

उंबरखिंड हा पुण्या - मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा सुंदर व सोपा ट्रेक आहे. उंबरखिंडी बरोबर लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ चा डोंगरही पाहाता येतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचा सोपा ट्रेक एकदा तरी करावाच असा आहे.

इतिहास :उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबानदी उजवीकडे वळण घेते. या नळीत एकदा शिरले की मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकड्या व अंबानदीचे पात्र व पूढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे बूच यामुळे शत्रू आपसूकच कोंडला जातो. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन महाराजांनी मोघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी सैन्याने व कमीत कमी वेळात सपशेल पराभव केला.


इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता.


खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.


खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. फौज दुपारपर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असतांना महाराजांच्या सैन्याने अचानक मोघली सैन्यावर हल्ला केला. बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.


अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहीत्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सैन्य रिकाम्या हातानी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले.

पोहोचण्याच्या वाटा :लोणावळा स्थानकाच्या फलाट क्र ५ च्या बाजूने (भूशी डॅमच्या) बाहेर पडावे. तेथून कुरवंडे गावात जाण्यासाठी बस किंवा खाजगी जीप मिळतात. त्याने १० मिनीटात आपण कुरवंडे गावात पोहोचतो. गावातूनच उजव्या हाताला ‘‘ड्यूक्स नोजचा’’ सुळका दिसतो तो चढून परत येण्यास साधारण १ तास लागतो.


कुरवंडे गाव घाट माथ्यावर आहे. तेथून उंबरखिंड उतरण्यासाठी मळलेली पायवाट होती. पण अलिकडेच गॅस कंपनीने पाईप लाईन टाकताना कच्चा रस्ता बनविलेला आहे. त्या रस्त्याने १ तासात आपण पायथ्याच्या चावणी गावात पोहोचतो. चावणी गावापासून ३० मिनीट अंतरावर ‘समरभूमी उंबरखिंड’ असा फलक डाव्या हाताला दिसतो. तेथून अंबानदीचे पात्र ओलांडल्यावर आपण स्मारकापाशी येतो. या स्मारकावर महाराजांची आज्ञापत्रे व उंबरखिंडीचा इतिहास कोरलेला आहे. येथून ठाकूरवाडी मार्गे पाली - खोपोली रस्त्यावरील शेमडी गावात पोहोचण्यासाठी १ तास लागतो. शेमडी गावातून बस अथवा रिक्षाने खोपोलीला जाता येते. उंबरखिंडीचा ट्रेक ९ मैलाचा व पूर्ण दिवसाचा आहे.


लोणावळा - कुरवंडे - चावणी - ठाकूरवाडी - शेमडी - खोपोली या मार्गाने जाता येते किंवा खोपोली -शेमडी या मार्गाने उंबरखिंड स्मारकापर्यंत जीपसारखे वहान पावसाळा सोडून आणता येते.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :१) लोणावळा मार्गे कुरवंडे गावातून उंबरखिंडीत पोहोचण्यास १ तास लागतो.यासाठी डोंगर उतरावा लागतो. २) खोपोली मार्गे शेमडी पासून उंबरखिंडीत पोहोचण्यास १ तास लागतो. त्यापुढे उंबरखिंड - चावणी - कुरवंडे या पायी प्रवासाला १ तास लागतो. यासाठी डोंगर पायथ्यापासून चढावा लागतो. कुरवंडे गावातून ‘ड्युक्स नोज’ पाहून परत येण्यास एक तास लागतो.

सूचना :हा ट्रेक सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्यान केल्यास अनेक रानफूले पाहायला मिळतात. या भागात कारवीची झाडे आहेत ती दर ७ - ८ वर्षांनी फुलतात. २००८ मध्ये फूलली होती. अंबानदीला पाणी नोव्हेंबर महीन्यापर्यंत असते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*माहिती स्रोत*

*ट्रेकक्षितिज.कॉम* *व*

*सोशल मीडिया व इंटरनेट*

किल्ले-चाकण १२

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇

⛳⛳⛳ *किल्ले चाकण* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 0

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्लेडोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : पुणे

श्रेणी : सोपी

पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भूइकोट किल्ला उर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भूइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. प्राचिन व दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे.

इतिहास :चाकणचा भूईकोट किल्ला हा प्राचिन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले(१४५३). या मोहीमेत विशाळगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून निबीड अरण्यात आणले व या मोक्याच्या जागी त्यांच्यावर अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली. (गनीमी काव्याने लढल्यागेलेल्या या पहिल्या लढाइचा समग्र वृत्तांत वाचण्यासारखा आहे ).


या मोहीमेत दक्षिणी मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात बेबनाव झाल्यामुळे दक्षिणेकडील मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परत आले. त्यांच्या भ्याड व फितूर वर्तनामुळे विशाळगड मोहीम अपयशी ठरली, असे परकिय मुसलमान बोलू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे दक्षिणी मुसलमानांना कळल्यावर त्यांनी शहाला खबर दिली की, परकीय मुसलमानांनी चाकणच्या किल्ल्यावर कब्जा केला असून त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. शहा दारु पिऊन तर्र झाला आहे हे पाहून त्याला ही बातमी देण्यात आली. त्याने हुकूम दिला चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करुन सर्व परकीय मुसलमानांना ठार मारावे. या आज्ञेनुसार दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्यातील परकीय मुसलमानांनी किल्ल्यातील सामग्री संपेपर्यंत वेढ्याला दाद दिली नाही. अखेरीस दक्षिणी मुसलमानांनी परकीय मुसलमानांना शहाने माफी केले आहे, असा बनावट हुकूम दाखवून त्यांना किल्ल्याच्या बाहेर काढले व त्यांना मेजवानीस बोलवले. जेवण चालू असतांना त्यांची कत्तल केली.


शिवाजी राजांचे पणजोबांचे(बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौर्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.


२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भूइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदूकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने इशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले, बुरुजावरील मराठे मारले गेले. मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.


पहाण्याची ठिकाणे :चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पुर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशव्दार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्प पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलीकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो.किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरिल कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंट चा रस्ता बांधण्यात आला आहे.

पोहोचण्याच्या वाटा :मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.


राहाण्याची सोय :राहाण्याची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.

जेवणाची सोय :जेवणाची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.

पाण्याची सोय :पिण्याच्या पाण्याची सोय स्वत: करावी.

सूचना :चाकणचा किल्ला, इंदुरी किल्ला, भंडारा डोंगर आणि भामगिरी एका दिवसात पाहाता येतात.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

किल्ला-नरनाळा ११

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳. गडकोट महाराष्ट्राचे
⛳⛳⛳ *किल्ले नरनाळा* ⛳⛳⛳किल्ल्याची ऊंची : 3161
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातपुडा (मेळघाट)जिल्हा : अमरावती
श्रेणी : सोपी
नरनाळा अभयारण्य हे विर्दभातील प्रसिध्द असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. याच अभयारण्यत नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे. यातील पूर्वेकडील (उजवीकडील) गडाला "जाफराबादचा किल्ला" , मधील गडाला "नरनाळा" व पश्चिमेकडील(डावीकडील) गडाला "तेलीया गड" म्हणतात. यातील जाफराबाद किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "कोअर एरीयात" गेल्यामुळे पाहाता येत नाही, तर तेलीया गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. हे तीनही किल्ले नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा व पूरातत्व कायदा या दोनही कायद्यांचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावरील वास्तू सुस्थितीत आहेत, पण त्याच बरोबर जंगलाचा विळखा या वास्तूंभोवती पडत आहे.
नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. संध्याकाळी ५.०० वाजल्या नंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही. हे अभयारण्य दर मंगळवारी व राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असते. नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी गाडीचे व माणसांचे प्रवेशशुल्क भरावे लागते. नरनाळा किल्ल्याचा घेर मोठा असल्यामुळे किल्ला संपूर्ण पहाण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो. तेथे भेटलेल्या वनाधिकार्याच्या सांगण्यानुसार नरनळा किल्ल्याचाही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या "कोअर एरीयात" लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा किल्ला सुध्दा गडप्रेमींना पहाणे अशक्य होईल



इतिहास :आज अस्तित्वात असलेल्या नरनाळा किल्ल्याचा एतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख " तारिख-ए-फरीश्ता" या ग्रंथात आढळतो. या किल्ल्याची दुरुस्ती इ.स.१४२५ मध्ये बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने केल्याचा तो उल्लेख आहे . पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वर्हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली.
इमादशाही घराण्याने ९० वर्षे वर्हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले.
इ.स.१५९८ मध्ये अकबराने नरनाळा किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला. इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला.
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाले व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.
पहाण्याची ठिकाणे :नरनाळा किल्ला ३३२ एकरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी अंदाजे २४ किमी आहे. किल्ला २ भागात विभागलेला असून खालच्या भागात शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा ही प्रवेशव्दारे आहेत ,तर वरच्या भागात इमारती व तलाव आहेत.

शहानुर दरवाजा:- नरनाळा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या काळी शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा अशा तीन दरवाजांची माळ होती. शहानुर गावातून नरनाळा किल्ल्यावर जातांना अंदाजे ५ किमी वर " शहानुर दरवाजा " आहे. या दरवाजाच्या कमानीवर शरभ शिल्प कोरलेली आहेत, त्यामुळे या दरवाजाला "शेर दरवाजा" असेही म्हणतात. या काळ्या पाषाणात बांधलेल्या दरवाजाला तीन कमानी आहेत . दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत, तसेच छतावर कोरीवकाम केलेले आहे.

मेहंदी किंवा मेंढा दरवाजा :- शहानुर दरवाजाच्या पुढे साधारणत: १ किमी वर मेहंदी किंवा मेंढा दरवाजा आहे. या दरवाजाची कमान शाबूत आहे, पण बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत.

महाकाली दरवाजा :- मेहंदी दरवाजाच्या पुढे काही अंतरावर "महाकाली"/ मुहम्मदी हा सुंदर व प्रशस्त दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस काळ्या दगडात बांधलेला प्रशस्त दरवाजा व बुरुज आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. त्यापुढे प्रशस्त मोकळी जागा आहे. त्याच्या बाजूने कमानी असलेला ओटा आहे. या भागाचा वापर कचेरीसाठी (चावडी) होत असावा. या ओट्यांखाली तळघर आहे, तसेच प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना या ओट्यांवरूनच काढलेला आहे. या ओट्यांच्या शेवटी तपकीरी रंगाच्या दगडात बांधलेले महाकाली प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस बुरुज असून त्यात अप्रतिम कोरीव काम केलेले गवाक्ष आहेत. संपूर्ण प्रवेशव्दाराची उंची ३७ फूट असून कमानीची उंची १५ फूट आहे.

महाकाली प्रवेशव्दारावर फारसीत कोरलेला चार ओळींचा शिलालेख आहे. हा सुलेखनाचा (कॅलिग्राफीचा) अप्रतिम नमुना आहे. दुरून पाहील्यास हा शिलालेख न वाटता पानाफुलांची (वेलबुट्टीची) नक्षी वाटते.हा शिलालेख इ.स. १४८७ मध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. त्याच्या वर दोन्ही बाजूस छोट्या खिडक्या आहेत. प्रवेशव्दारावर दगडात कोरलेली फुले आहेत.

महाकाली दरवाजातून बाहेर पडल्यावर डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा फुटतात. प्रथम त्यापैकी उजवीकडील वाट पकडावी. काही अंतर चालून गेल्यावर वाटेत एक दगडी रांजण आहे.त्याच्या पुढेच एक बुरुज आहे.या बुरुजावर जाण्यासाठी जीना आहे. हे सर्व पाहून पुन्हा महाकाली दरवाजापाशी यावे. तेथून डावीकडे जाणारी वाट पकडावी. थोड्या अंतरावर डाव्या बाजूस सावरवली बागची आणि गज बहादूर वली यांची घुमटाकृती कबर आहे.

राणी महाल :- कबरीवरून पुढे जाणारी चढाची वाट १५ मिनीटात एका छोट्या दरवाजापाशी पोहोचते. हा दरवाजा ओलांडून गेल्यावर अंबर महाल/अंबा महाल/ राणी महाल/बारादरी ह्या नावांनी ओळखली जाणारी भव्य वास्तु दिसते. ही इमारत १९ मीटर * ६ मीटर आकाराची असून, तीला तीन कमानी आहेत. इमारतीत हवा खेळती रहावी म्हणून ८ झरोके आहेत. तसेच भिंतींमध्ये कोनाडे आहेत. इमारतीला ३ घुमट असून त्यांच्या आतील बाजूस कोरीवकाम केलेले आहे. पूर्वीच्या काळी त्यावर निळ्या रंगाचा लेप होता, परंतू आता एक दोन ठिकाणीच तो पाहायला मिळतो.या इमारतीवर जाण्यासाठी जीना आहे. इमारती खाली तळघर आहे,(स्थानिक लोक याला भूयार म्हणतात.) परंतू तेथे जाण्याचा मार्ग आता बंद झाला आहे.
राणी महालासमोर फरसबंदी केलेले पटांगण आहे. त्यात मध्यभागी कारंजे आहे. याशिवाय दगडी रांजण व मंडप घालण्यासाठी केलेली छिद्रे येथे पाहायला मिळतात. अंबर महालाच्या बाजूस मशिद आहे

शक्कर तलाव :- .राणी महालासमोरील पटांगण ओलांडल्यावर आपण शक्कर तलावापाशी पोहोचतो. या तलावाच्या काठावर बुर्हाणउद्दीन पीराचे थडगे आहे. थडग्यावर फार्सी शिलालेख कोरलेला आहे. या स्थानाला पीर/ कुत्तरदेवाचे ठिकाण म्हणून ओळखतात. शक्कर तलावात आंघोळ करून पीरा जवळ काही विधी केल्यावर कुत्रा चावलेला माणूस बरा होतो अशी येथील लोकांची अंधश्रध्दा आहे. या तलावाबाबत अनेक दंतकथा ही प्रचलीत आहेत.
नरनाळ्यावरील सर्वच तलाव हे "रेन वॉटर हारवेस्टींग" तंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहाणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. पीराजवळ उभे राहीले असता उजव्या बाजूस उतारावरून वाहाणारे पाणी तलावात वळवण्यासाठी बांधून काढ्लेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो, तर डाव्या बाजूस पाणी वळवण्यासाठी कातळात उतार कोरून काढलेला पाहायला मिळतो. या कातळावर एक छोटा दरवाजा आहे.

शक्कर तलावावरून दोन वाटा फूटतात. उजवीकडील वाट अंबरखान्याकडे (तेल तुपाचे टाके) जाते, तर डावीकडील वाट डांबरी रस्त्याकडे (घोड्याच्या पागा) जाते. प्रथम उजवीकडील वाट पकडावी.

अंबरखाना (तेल तुपाचे टाकं):- शक्कर तलावावरून उजवीकडे वळल्यावर थोड्या अंतरावर तीन कमानी आपले लक्ष वेधून घेतात. या कमानी एका दगडी बांधीव टाक्यावर उभारलेल्या आहेत. या टाक्यांना तेल तुपाचे टाकं असे म्हणतात. या टाक्यामध्ये भिंती बांधून त्याचे तीन भाग करण्यात आलेले आहेत. टाकं वरून बंद केलेले असून त्याला वरील बाजूस तीन झडपा (दरवाजे) ठेवलेल्या आहेत. या टाक्यांचे कड्याजवळील स्थान व रचना पाहाता या टाक्याचा उपयोग तेल तुप साठवण्यासाठी नसून धान्य साठवण्यासाठी केला जात असावा.
अंबरखान्यावरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला दारुखान्याची इमारत आहे. तेथून किल्ल्याच्या कडेकडेने थोडे पुढे गेल्यावर एक प्रचंड तोफ दिसते ,तीला नौगजी तोफ म्हणतात.

नऊगजी तोफ :- किल्ल्याच्या पश्चिम टोकावर एक प्रचंड दक्षिणमुखी तोफ आहे. हि तोफ १८ फूट लांब असून तीचा परीघ ६ फूट आहे. तोफेच्या लांबीवरूनच तीला नऊगजी तोफ हे नाव पडले आहे. या तोफेवर फारसी लेख कोरलेला आहे. या तोफेजवळील कड्यावरून खालील बाजूस किल्ल्याचा अजून एक दरवाजा दिसतो.

नऊगजी तोफेवरून किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने (डोंगराच्या कडेकडेने) पुढे चालत गेल्यावर १० मिनीटात आपण दमयंती तलावापाशी (सागर तलाव) पोहोचतो. येथे दोन रस्ते फूटतात. एक रस्ता जाफराबाद किल्ल्याच्या दिशेला (पूर्वेला) जातो , तर दुसरा रस्ता मागे वळून राम तलावाच्या दिशेला जातो. आपण प्रथम जाफराबाद किल्ल्याच्या दिशेने जावे. वाटेत उजव्या बाजूस किल्ल्याची तटबंदी व बुरुज आपली साथ करतात, तर डाव्या हाताला एक चौकोनी बुरुज पाहायला मिळतो. रस्त्यात वनखात्याने प्राण्यांसाठी बांधलेले पाणवठा पाहायला मिळतो. या पाणवठ्याच्या पुढे पाउलवाटेच्या दोनही बाजूला दोन बुरुज आहेत. तेथून पुढे गेल्यावर आपण एका बांधीव तलावापाशी पोहोचतो. येथे पायवाट संपलेली आहे. तलावाच्या बाजूला वनखात्याने बांधलेले लपण व वॉचटॉवर आहे, त्यावरून किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते.
हे सर्व पाहून परत फिरावे व दोन रस्ते फूटतात त्या फाट्यावरून राम तलावाच्या दिशेला जावे. वाटेत उजव्या हातास खालच्या बाजूला एक दरवाजाची कमान दिसते. खाली उतरून गेल्यावर या दरवाजाची भव्यता कळते. हा उत्तरेला असलेला दरवाजा " दिल्ली दरवाजा" या नावाने ओळखला जातो. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत.

मोती तलाव (मोठा तलाव) :- दिल्ली दरवाजाच्या पुढे हा बारमाही तलाव असून याच्या एका बाजूला कमान आहे.

म्हसोबाचा ओटा :- मोती तलावाला वळसा घालून गेल्यावर एका झाडाखाली मारुतीची दगडात कोरलेली मुर्ती व सती शिळा पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर म्हसोबची दगडात कोरलेली मुर्ती पाहायला मिळते यालाच म्हसोबाचा ओटा म्हणतात. या परीसरात अनेक वीरगळी व सती शिळा आहेत पण दाट झाडीमुळे (या परीसरात खाजखुजलीची बरीच झाडे आहेत) त्या पाहायला मिळत नाहीत.

राम तलाव (धोबी तलाव) :- म्हसोबाचा ओटा पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागल्यावर उजव्या बाजूस राम तलाव आहे. हा बारमाही पाण्याचा तलाव भोसल्यांच्या राजवटीत या तलावाजवळ बगिचा होता व त्याला दगडांच्या पन्हाळी व्दारे पाणी देण्याची व्यवस्था होती.

राम तलाव पाहून इमली तलावाच्या बाजूने ५ मिनीटात आपण गेस्ट हाऊस पाशी पोहोचतो. येथ पर्यंत डांबरी रस्ता आलेला आहे. या रस्त्याने खाली उतरायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूस शक्कर तलाव दिसतो , तर डाव्या बाजूस मशिद , घोड्याच्या पागा, गजशाळा व इतर वास्तू पाहायला मिळतात.

येथे आपली गडफेरी पूर्ण होते. याशिवाय गडावर खम तलाव, चंद्रावती तलाव, शिरपूर दरवाजा, खूनी बुरुज , कैदखाना, इत्यादी पाहाण्यासारखी ठिकाणे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :अकोला हे विर्दभातील प्रसिध्द शहर आहे. तसेच अकोला हे मध्य रेल्वेच्या मुंबई - नागपूर मार्गावरील प्रनुख स्थानक आहे. अकोल्या पासून नरनाळा किल्ला ६६ किमी वर आहे. अकोल्याहून ४० किमी वर अकोट हे तालुक्याचे गाव आहे. अकोटहून पोपटखेड मार्गे शहानुर हे नरनाळा किल्ल्याचे गाव २० किमी वर आहे. शहानुर गावाताच वनखात्याची चौकी आहे. तिथे पावती फाडून ६ किमी वरील नरनाळा गडावर वहानाने किंवा चालत जाता येते.
राहाण्याची सोय :गडावर रहाण्याची सोय नाही, पण अकोला, अकोट किंवा शहानुर गावात निवासाची सोय आहे. शहानुर गावात वनखात्याची व खाजगी निवासाची सोय आहे, पण त्यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागते.
जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, परंतू शहानुर गावात जेवणाची सोय आहे. किल्ला संपूर्ण पाहाण्यास अख्खा दिवस लागतो, त्यामुळे बरोबर खाण्याचे साहित्य बाळगावे
पाण्याची सोय :गडावरील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे, पण पाण्याचा साठा सोबत असल्यास उत्तम.
जाण्यासाठी लागणारा वेळ : शहानुर या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातून चालत गडावर पोहोचण्यास २ ते अडीच तास लागतात. किल्ला संपूर्ण पाहाण्यास पूर्ण दिवस लागतो.जाण्यासाठी उत्तम कालावधी :नोव्हेंबर ते फेब्रूवारी हा किल्ल्यावर जाण्याचा उत्तम काळ आहे.
सूचना :१) नरनाळा किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे भाड्याच्या/ स्वत;च्या वहानाने शहानुर, मेहंदी दरवाजे पाहून गाडी महाकाली दरवाजा जवळ सोडून पुढचा किल्ला चालत पहावा व गाडी शक्कर तलावाजवळ बोलवून घ्यावी . यामुळे किल्ला व्यवस्थित व वेळेत पाहाता येतो.

२) नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा व पूरातत्व कायदा या दोनही कायद्यांचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावर फिरतांना सावधगिरी बाळगावी. झाडांच्या फांद्या तोडू नये ,जंगलातील कुठलीही( पाने, फुले, बीया इत्यादी) वस्तू जागेवरून हलवू नये, तसेच बरोबर आणू नये.

३) नरनाळा किल्ला पाहाण्यासाठी वनखात्याचा माणूस किंवा स्थानिक माणूस (वाटाड्या) घेतल्यास किल्ल्यावरील जंगलात विखुरलेले/ लपलेले अवशेष शोधणे शक्य होते.

४) नरनाळा किल्ला पहातांना सोबत दिलेला नकाशा वापरल्यास सर्व किल्ला व्यवस्थित व कमी वेळात पहाता येतो.

🥗🥗🥗🥗🥗🥗

किल्ला-दुर्ग १०

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇

⛳⛳⛳ *किल्ले दुर्ग* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 3900

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: भीमाशंकर

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. उत्तुंग खड्या कातळ भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाग कडे, अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे. या डोंगर रांगेत कळसूबाई (५२०० फूट) , कुलंग (४८०० फूट), रतनगड (४२०० फूट), आजोबा पर्वत (४६०० फूट) ,हरिश्चंद्रगड (४७००फूट) , जीवधन (३८०० फूट ), दुर्गा किल्ला (३९०० फूट), सिध्दगड (३२०० फूट), नानाचा अंगठा अशी एकाहून एक ऊंच शिखर / किल्ले आहेत. नाणेघाट, दर्या घाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, माळशेज घाट इत्यादी घाट वाटा या डोंगररांगेत आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर दुर्ग किल्ला आहे. धाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’. दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते, तर वीज, शिक्षण तर दूरच राहीले. येथील मुख्य व्यवसाय शेती तर काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पणा केला जातो.

इतिहास :कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे. दुर्ग किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा.


पहाण्याची ठिकाणे :पोहोचण्याच्या वाटा :१) जुन्नर - आपटाळे मार्गे आंबोली गावात यावे. गावा बाहेरील गणपती मंदिरा मागुन एक वाट दर्या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या वाटेने दर्या घाटा उजवीकडे ठेवून चालत राहील्यास थोड्याच वेळात एक गुहा दिसते. पुढे डाकेश्वराच मंदिर आहे. इथुन दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गेच्या मंदिरात पोहोचायला साधारणतः २ तास लागतात. येथुन गड माथा गाठ्ण्यासाठी अवघड पायवाटेने वर चढावे लागते. दुर्गादेवीच्या मंदिरासून किल्ल्यावर पोहण्यास २० मिनिटे लागतात. येथून गोरखगड ,सिध्दगड आणि मच्छिंद्रगड असा सर्व परिसर दिसतो. दुर्ग किल्ल्यावरुन पायवाटेने धाकोबा गडावर जाण्यास साधारणतः २ तास लागतात.

राहाण्याची सोय :दुर्गच्या पायथ्याशी असणार्या दुर्गादेवीच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते

जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.

सूचना :धाकोबा आणि दुर्ग हे किल्ले एकत्रच पाहीले जातात.

🥗🥗🥗🥗🥗🥗

*माहिती स्रोत*

*ट्रेकक्षितिज.कॉम* *व*

*सोशल मीडिया व इंटरनेट*

किल्ले-विजयदुर्ग ०९

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀ *किल्ला क्र.09* 🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀
⛳⛳⛳ *किल्ले विजयदुर्ग* ⛳⛳⛳
विजयदुर्ग किल्ल्याचा माहिती
विजयदुर्ग किल्ला हा महराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्यातील देवगडजवळील विजयदुर्ग गावाजवळचा एक ऐतिहासीक किल्ला आहे. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला जवळपास सतरा एकरात पसरलेला आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेडलेला व अतिशय भक्कम अशा तिहेरी तटबंदीने बांधलेला हा किल्ला आहे. ह्या किल्ल्यावर एकूण जवळपास २७ बुरुज आहेत. हा मराठ्याच्या आरमार इतिहासातील एक महत्वपूर्ण किल्ला आहे.
विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
विजयदुर्ग किल्लाचे जुने नाव "घेरिया" असे होते. विजयदुर्ग किल्ला हा ११व्या शतकातील शिलाहार घराण्याच्या राजा भोज याने बांधला. पुढे इथे बहामनी व आदिलशाही यांनी राज्य केले. पुन्हा १६५३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा जिंकला . जवळपास १६५३ ते १८१८ पर्यत हा किल्ला मराठ्याच्या साम्राजात होता. पुढे त्या किल्ल्याचा ताबा इंग्रजाकडे गेला.
विजयदुर्ग किल्ल्यावर काय पाहाल ?
हनुमान मंदिर :- मुख्य तटबंदीतून आत आल्यावर व किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर गडात प्रवेश करताच आपणाला हनुमान मंदिर दिसेल. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला त्या वेळी महाराजांनी गडावर हनुमान मंदिर बांधले. आता ह्या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली आहे. मंदिराजवळ एक भग्न अवस्थेत असेलेली तोफ पहावयास मिळेल.
जिबीचा दरवाजा :- हा किल्ल्यावरील पहिला दरवाजा प्रशस्थ तटबंदी बांधला गेलेला एक भक्कम दरवाजा आहे. थोडे पुढे गेल्यावर आपणाला किल्ल्याच्या तटबंदीवर पांढरे डाग दिसतील हे डाग तोफांच्या भडीमारचे आहेत. १७१८ साली इंग्रजानी केलेल्या ह्मल्याची त्या खुणा साक्ष देतात त्यावेळी किल्ल्या काणोजी आंग्रे याच्या ताब्यात होता. तसेच तटबंदी मध्ये आपणाला जंग्या ज्या बाणांच्या किंवा बंदुकीच्या साह्याने शत्रू वर मारा करण्यासाठी बनवल्या आहेत तसेच फांज्या जिथुन शत्रूवर मोठ्या तोफा मार्फत हमला केला जाई. तसेच किल्ल्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तटबंदीतून जागोजागी नाले काढण्यात आले आहेत.
महादरवाजा :- जीबीच्या दरवाजातून थोडे पुढे चालत गेल्यावर आपणाला वक्राकार आकाराची तटबंदी दिसते त्याच्या आत मध्ये पायऱ्या चढून गेल्यावर हा दरवाजा लागतो. यालाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा असे हि म्हणतात. अतिशय भक्कम व मजबूत असा किल्ल्याचा दरवाजा आहे. त्याच्या आत आपणाला पहारेकारच्या देवरी व दरवाजावर नगारखाना पहावयास मिळते. याच दरवाजातून आत आल्यावर आपला समोरच तोफगोळ्यांची रास पहावयास मिळते.
खलबतखाना :- खलबतखानाचा उपयोग कारभारची बैठक किंवा लढाई करण्याचे मनसुबे आखण्यासाठी करत असे. ह्या वास्तूची रचना अर्धगोलाकुर्ती पद्धतीची आहे.हि एक मजबूत अशी वास्तू आपणाला पहावयास मिळते.
खुबलढा बुरज :- ह्या बुरजावर ६ फांज्या आहेत व त्या प्रत्येक फांज्यामध्ये एकूण २ तोफा लावलेल्या असत त्यामुळे याला खुबलढा तोफाबारा असे हि मानतात. या ठिकाणावरून तीन ठिकाणी मारा करता येतो.
भूयारी मार्ग :- किल्ल्यावर दोन भूयारी मार्ग आहेत एक जो मार्ग आहे तो खुबलढा बुरजावर जातो व के भूयारी मार्ग धान्याचे कोठर आहे त्या दिशेला जातो. हि किल्ल्यावरील कुतुहलाचे ठिकाण आहे.
घोड्याच्या पागा :- विजयदुर्ग किल्ल्यावर घोड्यांना बांधण्यासाठी एक मोठी वास्तू आहे इथे जवळपास ६० ते ७० घोडे बांधण्याची जागा आहे. जवळ आपणाला सदरची इमारत पहावयास मिळते.
दारुगोळा कोठार :- सदरेतून बाहेर आल्यावर आपणाला एक छोटेखानी एक इमारत पहावयास मिळते तेच दारुगोळा कोठार होय किल्ल्यावर तोफांची संख्या जास्त असल्यामुळे दारुगोळा भरपूर प्रमाणात लागत असे.
साहेबाची ओठी :- ह्या जागेवर आपणाला एक टेलिस्कोप पहावयास मिळेल याच जागेवरून १८६५ रोजी ब्रिटीश नॉर्मन लॉकियर याने सूर्यावर हेलियम असल्याचा शोध लावला होता.
धान्याचे कोठार :- साहेबाच्या ओटी पासून समोर आपणाला एक वास्तू नजरेस पडते हि वास्तू धान्यचे कोठार आहे. अतिशय मजबूत अशी बांधकामाने बांधलेली हि वास्तू आहे. जवळ आपणाला पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला एक मोठा हौध नजरेस पडतो ह्या हौधाचा उपयोग जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जाई. ह्या हौधला खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत.
चुन्याचा घाणी :- गडाच्या डागडुजीसाठी वापरण्यात येणारा चुना किल्ल्यावर ह्या चुन्याची घाणीत बनवण्यात जात असे. त्याच्या थोडेसे पुढे गेल्यावर आपणाला घोड्याच्या नालेच्या आकारची गोड्या पाण्याची विहीर पहावयास मिळते.
पाण्यातील भिंत :- जवळपास १७ व्या शतकातील हि भिंत पाण्याखाली बांधण्यात आलेली असावी असे तज्ञाचे मत आहे. हि भिंत गणेश बुरज याच्या बाजूला आहे. ही भिंत मोठमोठे दगडावर बांधली आहे. याची कुतुहलाची बाब अशी कि हि भिंत ओहटी आली तरी नजरेस पडत नाही. याच्यामुळे शत्रूच्या जहाजे या भिंतीवर आदळून नष्ट होत असत त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण होत असे.
विजयदुर्ग किल्ला कसे पोहचल ?
मुंबई- गोवा महामार्गावरून तळेरे गावापासून विजयदुर्ग साधारणपणे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे. येथून आपणाला एस-टी बस किंवा खाजगी वाहने मिळू शकतात. गडाच्या पायथ्याशी विजयदुर्ग गाव आहे इथे आपल्या खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...