हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० एप्रिल, २०१९

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*गडकोट महाराष्ट्राचे
*किल्ला क्र.६१*
⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 50

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले

डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : जळगाव

श्रेणी : सोपी

जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे.

इतिहास :
इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाई झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाला बोरी नदीच्या बाजूने दोन भक्कम बुरुज व तटबंदी आहे. त्यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बहादरपूर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात येते. पारोळ्या पासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे.

२) धुळे - जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही. आपण स्वत:च करावी.

सूचना :
अंमळनेर (२० किमी) - पारोळा (८ किमी) - बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहता येतात.

किल्ला-सिंदखेडराजा (६०)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳गडकोट महाराष्ट्राचे*
किल्ला क्र.६०*
⛳⛳⛳ *किल्ले सिंदखेडराजा* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बुलढाणा
श्रेणी : सोपी

सिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव जिजामातांचे जन्मस्थळ आहे . येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला होता . त्यामुळे हे स्थळ आता मातुलतिर्थ या नावाने ओळखले जाते . लखुजी जाधवांची गढीची देखभाल पूरातत्व खात्याने उत्तमप्रकारे ठेवलेली आहे . सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळात १०/- रुपयाचे तिकिट काढून गढीत जाता येते.


सिंदखेडराजा गावातील गढी , काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर , सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव आणि त्यांच्या पुत्रांच्या समाध्या , पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या ऐतिहासिक वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

इतिहास :
सिंदखेड येथे गवळी राजाची राजवट होती . त्याने गाई गुरांसाठी गावात काही तलाव बांधले . सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती . गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली . यातून मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला वाचली . ती दौलताबादला लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली . लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड परगणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी फौजेनिशी जाऊन रविरावचे बंड मोडून काढले . मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा कोणीही नसल्याने लखुजी जाधवाना १५७६ ला सिंदखेडची देशमुखी मिळाली . त्यानंतर सिंदखेडची भरभराट झाली . लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली , बाजारपेठा वसवल्या . निळकंठेश्वर रामेश्वर मंदिरांची दुरुस्ती केली .

लखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच १२ जानेवारी १५९८ या दिवशी गढीतील राजवाड्यात जिजाऊचा जन्म झाला . इसवीसन १६१० मध्ये शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह सिंदखेडराजा येथे झाला .

२५ जुलै १६२९ रोजी निजामाने लखुजी जाधव यांना दौलताबादेस बोलवले. लखुजी जाधव , पत्नी म्हाळसाबाई , भाऊ जगदेवराव , पुत्र अचलोजी , राघोजी व बहादूरजी , नातू यशवंतराव यांच्यासह दौलताबादला गेले.

लखुजी राजे दरबारात जाताच निजामाच्या मारेकऱ्यांनी लखुजी जाधव त्यांचे दोन पुत्र आणि नातू यांना ठार केले .
पहाण्याची ठिकाणे :
गढी सिंदखेडराजा गावात भर वस्तीत आहे . गढीच्या बाहेरच्या बाजूला बगिचा बनवलेला आहे . त्यात जिजामातेचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे . गढीचा प्रवेशद्वार भव्य आहे. गढीच्या भिंती १५ फुटापर्यंत दगडाने बांधलेल्या असून त्यावर विटांचे बांधकाम केलेले आहे. विटांच्या बांधकामात जंग्या ठेवलेल्या आहेत . प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत . त्यात सध्या पुरातत्व खात्याने अनेक मुर्ती, वीरगळ , जाती आणून ठेवलेल्या आहेत . हे सर्व पाहून गढीत प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याची भिंत दिसते . एकेकाळी हा राजवाडा दोन मजले उंच होता. आता मात्र त्याचे भग्नावशेष राहीलेले आहेत . पुरातत्त्व खात्याने उरलेल्या अवशेषांची योग्य डागडूजी केलेली आहे . गढीत शिरल्यावर उजव्या बाजूला गेल्यावर तटबंदीला लागून एक विहीर आहे . गढीतील पाण्याचा हा एकमेव स्त्रोत असावा. विहिर पाहून वाड्याच्या टोकापर्यंत चालत जावे . या ठिकाणी वरच्या बाजूला एक खोली आहे . ते जिजामाताचे जन्मस्थान आहे . या खोलीत जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा पुतळा बसवलेला आहे . वाड्याला तळघर आहे . तळघरात उतरण्यासाठी चार ठिकाणी जीने आहेत . वाड्याच्या मधल्या भागात सुंदर बगिचा केलेला आहे . तळघरात उतरणाऱ्या जिन्याने खाली उतरल्यावर कमानींवर तोललेला व्हरांडा पाहायला मिळतो. व्हरांड्याच्या एका बाजूला खोल्या आहेत. व्हरांड्यात आणि खोल्यान्मध्ये हवा आणि प्रकाश खेळता राहावा यासाठी झरोके केलेले आहेत . झरोक्यांची रचना अशाप्रकारे केलेली आहे की , प्रकाश आत येइल पण पावसाचे पाणी आत येणार नाही .

तळघर पाहून वाड्याच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर यावे . याठिकाणी जे अवशेष उरले आहेत त्यावरून येथे कचेरी किंवा दरबार हॉल असावा .

हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते. गावातील ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी गढीच्या समोर असणारा जालना रस्ता गाठावा . या रस्त्याने जालनाच्या दिशेने ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक गल्ली जाते . या गल्लीत शिरल्यावर थोडे पुढे उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात. चार बुरुज आणि तटबंदी असलेल्या या वास्तूला काळा कोट म्हणतात. तटबंदीच्या आत पुरतत्व खात्याने बनवलेले म्युझिअम आहे .

काळाकोट पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रंगमहाल आहे . या महालाची रचना चौसोपी वाड्यासारखी आहे . महालात शिरण्यासाठी प्रवेशव्दार आणि त्याच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. महालाचे लाकडी छत पुन्हा नव्याने बनवलेले आहे . महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी जीने आहेत . गच्चीवर पाण्याचा कोरडा हौद आहे . या हौदाच्या बरोबर खाली असलेल्या तळमजल्यावरील खोलीत शौचकूप आहेत.

रंगमहाल पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरा लागूनच एक बारव आहे. सजना बारव या नावाने ती ओळखली जाते . बारवेच्या काठावर ३ पिंडी आहेत. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर शेषशायी विष्णूची अप्रतिम मुर्ती आहे . मंदिराची रचना वाड्यासारखी असून त्यात विटानी बांधलेल्या कमानी सुंदर आहेत .

निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या अलीकडे शेताच्या कडेला काही समाध्या आहेत . याठिकाणी एक गणेशमुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. ऱामेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे . मंदिरावर फारसे कोरीवकाम नाही . मंदिराच्या आतील खांबावर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरात काही तुळशी वृंदावन आहेत .

रामेश्वराचे दर्शन घेउन त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर लखुजी जाधवांची , त्यांचे पुत्र आणि नातवाची भव्य समाधी आहे. समाधीच्या बांधकामात इस्लामी बांधकाम शैलीची छाप पडलेली आहे. समाधीच्या समोरच्या बाजूला छोट्या समाध्या आहेत .

वरील सर्व ठिकाणे पाहायला एक तास लागतो. पुन्हा आल्या मार्गाने मुख्य रस्त्यावर यावे आणि जालन्याच्या दिशेने चालायला सुरुवात करावी . साधारण १० मिनिटात उजव्याबाजूला एक तलाव आणि त्याच्या मधोमध पाण्यात बांधलेला एक छोटेखानी महाल दिसतो. तो चांदनी तलाव आहे.
त्याच रस्त्याने १ किलोमीटर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका तलावाची भिंत आणि त्यात बनवलेला महाल दिसतो. या तलावाला मोती तलाव या नावाने ओळखले जाते. महाल दोन मजली असून खालचा मजला पाण्याच्या पातळीच्या थोडा वर आहे . महालाचे सज्जे तलावाच्या बाजूला काढलेले आहेत . तलावात उतरण्यासाठी महालात जीने आहेत.

या तलावांबरोबरच गावात पुतळा बारव नावाची अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुरसुंदरीच्या मुर्तीमुळे ही बारव पुतळा बारव या नावाने ओळखली जाते .

सिंदखेडराजा मधील ही सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
सिंदखेडराजा रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. सर्व महत्वाच्या शहरातून सिंदखेडराजाला एसटीच्या बसेस जातात. सिंदखेडराजाहून जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे . जालन्याहून एका तासात सिंदखेडराजाला पोहोचता येते .
राहाण्याची सोय :
सिंदखेडराजा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.

किल्ला-देवगिरी (५९)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*गडकोट महाराष्ट्राचे* *किल्ला क्र.5    



⛳⛳⛳ *किल्ले देवगिरी* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची : 2975

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: देवगिरी

जिल्हा : औरंगाबाद

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते. सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी "सुरगिरी" या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची "देवगड व धारगिरी" अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या. या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती. यापैकी ‘ लासूर वेस ’ एक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे.
१ किल्ल्यातील वास्तू :
आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले, ज्यांची लांबी १२ सेंमी एवढी आहे, असे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्यांच्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्याच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्या दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्या प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्या दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्या दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे. विहीरीत उतरण्यासाठी पायर्यांची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची.

२ हत्ती तलाव :
मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी रुंदी-३८ मी खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते.

३ भारतमाता मंदिर :
या हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जाणार्या वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे.

४चांद मिनार :
भारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत. सध्या या मनोर्यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चांद मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. हे सर्व पाहून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात.

५ कालाकोट देवगिरी :
कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्यांच्या देवड्या, मग पायर्या लागतात. या सर्व पायर्या चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्या लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्या लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्यातून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या’ मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत .आत गेल्यावर एक निमुळता चौक दिसतो. तो उघडाच आहे. यावर छत नाही तो ४ ते ५ माणसे मावतील एवढाच आहे, त्यामुळे तिथे पोहचल्यावर उजवीकडच्या पायर्यांनी ओट्यावर चढावे लागते. कारण चौकात आल्यावर ओट्यावर चढणे हा एकच मार्ग आहे. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनविलेला आहे. येथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकुन शत्रु इथपर्यंत आला तर पुढे या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोरवाटे सारखा दिसणारा मार्ग ठेवलेला आहे.या खिडकी खाली दोन पायर्या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय केलेली आहे. पण खरा भुयारी मार्ग तर डावीकडे आहे. एवढेच नव्हे तर वर काही काही ठिकाणी भुयारी मार्गात कातळातील खिडक्या आहेत. याचा उपयोग वर असणार्या सैनिकांना शत्रूवर दगडधोंडे टाकण्यासांठी होत असे. हा सर्व भुयारी मार्ग ५० ते ६० मी लांबीचा आहे. पुढे या भुयारी मार्गातूनच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायर्या बांधलेल्या आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर शेवटच्या ठिकाणी जिथे आपण वरच्या टप्प्यावर पोहचतो, तिथे एक तवा ठेवलेला असायचा. त्यावर गरम तेल व मिरच्या ओतून हा धूर या अंधारी मार्गात सोडण्यात येत असे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करुन हा किल्ला जेवढा अभेद्य बनवता येइल तेवढा बनवला होता. एकंदर पाहाता हा किल्ला एवढा अभेद्य, दुर्गम आणि भक्कम आहे की त्याला सरळमार्गाने जिंकूण घेणे कठीणच होते.
भुयारी मार्गातून एकदा किल्ल्यावर आले की पुन्हा कातळकड्यात खोदलेल्या पायर्या लागतात. थोडे वर चढून गेले की गणेशाचे मंदिर आहे. एकंदर मंदिराच्या बांधणीवरुन हे मंदिर अलिकडच्या काळातील असावे. प्रथम वंदितो तुज गणराया असे म्हणून गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि वरच्या पायर्या चढायला लागायचे. १५० पायर्या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्यात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात.

पोहोचण्याच्या वाटा :
देवगिरीचा किल्ला औरंगाबाद - धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यात राहण्याची सोय नाही. औरंगाबादला राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :
किल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
औरंगाबादपासून अर्धा तास.

सूचना :
औरंगाबादहून देवगिरी , खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर , वेरुळची लेणी आणि औरंगाबादची पाणचक्की ही ठिकाण एकाच दिवसात पाहाता येतात. दररोज औरंगाबादहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सहल (गाइडेड टूर) या ठिकाणांना जाते.

रविवार, १४ एप्रिल, २०१९

किल्ला-::-मांगी-तुंगी (५८)

⛳ मांगी - तुंगी⛳

       मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे.
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते, ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणार्‍या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.

इतिहास

बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली.

पहाण्याची ठिकाणे :

मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते. मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. उन -वारा - पाऊस यामुळे या मुर्ती झिजलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही.

मांगी पेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत. त्यात जैन तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. त्यातील एका गुहेला बुध्द गुहा म्हणतात. तुंगी सुळक्यालाही प्रदक्षिणा मार्ग आहे.

पोहोचण्याच्या वाटा :

मांगी- तुंगीला जायचे असल्यास जाण्यासाठी नाशिक - सटाणा मार्गे (११३ किमी वरील) ताहाराबाद गाठावे. ताहारबाद - पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून ७ किमीवर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो.या रस्त्यावर भिलवडच्या पुढे दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गे ताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एसटी किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव आहे.

भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ, पाश्वर्नाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगीतुंगीच म्हणतात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर, या रस्त्यावर दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. पुढे पायर्‍या लागतात. सुमारे २००० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. येथे दोन वाटा फ़ुटतात. उजवी कडची वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावी कडची वाट मांगी सुळक्याकडे जाते.

मांगीसाठी :- प्रवेशव्दारातून डावीकडे गेलो की पुन्हा पायर्‍या चढून ३० मिनिटात मांगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत.

तुंगीसाठी :- प्रवेशव्दारातून उजवीकडे गेलो की आपण मांगी आणि तुंगी मधील डोंगरधारेवर येतो. या धारेवरून १० मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. तेथून पायर्‍या चढून १५ मिनिटात तुंगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत

ताहाराबादहून मांगीतुंगी पर्यंत जाण्यासाठी पूर्ण रिक्षा भाड्याने घेऊन जावे लागते.

ताहाराबाद ते भिलवड रिक्षा चालू असतात (सिट प्रमाणे पैसे देऊन). भिलवडहून मांगीतुंगी चालत गाठण्यास अर्धा तास लागतो.

राहाण्याची सोय :

गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय :

भिलवाडी गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :

गावातूनच पाणी घेणे आवश्यक आहे, कारण गडावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

पायथ्यापासून ३ तास लागतात.

सूचना :

१) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर झाडे किंवा शेड्स नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर चढुन गेल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो.

२) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर आणि सुळक्यांवर पिण्यायोग्य पाणी नाही.

३) मांगीतुंगी सुळक्यां पैकी मांगीच्या खाली १०८ फ़ूट उंच भगवान महावीरांची मुर्ती बनवण्याच काम चालू आहे. तिथे पर्यंत रस्ताही बनविलेला आहे. काही वर्षात भगवान महावीरांच्या मुर्ती पर्यंत गाडीने जाता येईल आणि तिथुन मिनिटात मांगीवर जाता येईल.
 ⛳

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

🌹🌹शिवराजमुद्रा🌹🌹

🚩 *शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ नेमकं काय सांगते?*



🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन.

👉 शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे.

*प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।*
*शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।*

▪ *मराठी अर्थ:* ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’

▪ *इंग्रजी अर्थ:* The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon. It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

किल्ले-वासोटा (५७)

*भटकंती साठी सातारा, महाबळेश्वर परिसरातील उत्तम किल्ला वासोटा गड*

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.

*नाव : वासोटा (व्याघ्रगड)*

*उंची : ४२६७ फूट्*

*प्रकार : वनदुर्ग*

*चढाईची श्रेणी : मध्यम (परिस्थितीनुसार अवघड)*

*ठिकाण : सातारा, महाराष्ट्र*

*जवळचे गाव : कुसापूर, चोरवणे*

*डोंगररांग : महाबळेश्वर कोयना*

*सध्याची अवस्था : व्यवस्थित*

सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.

सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.

*इतिहास*

वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत

शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --

*श्रीमंत पंत प्रतिनिधी*
*यांचा अजिंक्य वासोटा;*
*तेलिण मारी सोटा,*
*बापू गोखल्या सांभाळ कासोटा*


*वासोटा गडावर*

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...